वार्ताहर /कंग्राळी खुर्द
आझमनगर पेट्रोलपंपाबाजूने शाहूनगर वसाहतकडे जाणाऱया दुपदरी रस्त्यावर वेलनेस मेडिकल होलसेल दुकानासमोर पडलेला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. महानगरपालिकेच्या विशेष अधिकाऱयांनी याकडे त्वरित लक्ष देऊन खड्डा बुजवून वाहन चालकांना रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
आझमनगर पेट्रोल पंपाच्या बाजुच्या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासून मोठा खड्डा पडलेला असल्यामुळे एखाद्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या पाठीमागुन जाणाऱया दुचाकी वाहनधारकांना हा खड्डा दिसून येत नाही. साहजिकच या खड्डय़ामध्ये वाहन जाऊन लहान मोठे अपघात घडत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावरून पाणी जात असतेवेळी हा खड्डा दिसतच नाही. यामुळे अनेक वाहनधारकांना अचानक या खड्डय़ामध्ये वाहन गेल्यास त्यांचा वाहनावरील ताबा सुटू शकतो. तसेच एखाद्या वाहनधारकांचा जीवही जाऊ शकतो.
सदर रस्त्यावरून कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, शाहूनगर आदी परिसरातील वाहनधारक याच खड्डय़ामधून गचके खात बेळगावकडे जात व येत असतात. परंतु अजूनही कुणी सदर खड्डय़ाबद्दल तक्रार केली की नाही समजत नाही.
तेव्हा महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱयांनी त्वरित खड्डा बुजवून वाहनधारकांना रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.