शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी
शाहुवाडी/ प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील उचत पैकी लहीन गल्ली येथील युवकाला कोरोना लागण झाल्याच स्पष्ट झाल्याने या परीसरात भितीची छाया कायम असून सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी पूर्णता शुकशुकाट जाणवत आहे . पोलिसांनी नाकाबंदी केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवेश दिला जात नाही. उचत हद्दीतील लहिन गल्ली येथे राहणारा 3४ वर्षीय युवक पॉझिटिव्ह निघाल्याचे समजताच प्रशासनाने सतर्कता राखून त्याच्या संपर्कातील अनेकांना तपासासाठी ताब्यात घेतले असून आणखीन काहीजणांचा शोध सुरू आहे. आजही या परिसरातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून सर्वत्र सामसूम दिसत आहे या युवकाचा नेमका किती जणांशी संपर्क आला याचीच धास्ती परिसरात लागली असून आता कुटुंबीयांच्या रिपोर्ट कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान तालुक्यात सर्वत्र खळबळ माजली असून या युवकाचा ज्या ज्या ठिकाणी संपर्क आला आहे, तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र प्रशासनाने आव्हान केलं आहे की या युवकाचा कुणाशी संपर्क आला असेल तर त्यांनी समोर यावे कुणीही यापासून दूर राहू नये या युवकाच्या घरा शेजारील ही नागरिकांना तपासासाठी दाखल केले असल्याची ही माहिती पुढे आली आहे.
एकूणच कालच्या या घटनेने मलकापूर शहरात ही कमालीची दहशत निर्माण झाली असून सर्वच स्तरावर सतर्कता घेतली आहे. या परिसरातील रस्ते निर्मनुष्य दिसत असून नागरिक घरातच थांबून आहेत तर आरोग्य विभागाच्यावतीने उचत गावासह परिसरात विशेष मोहीम राबवून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. उचत गावात प्रवेश करणाऱ्या दोन्ही मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे तर संबंधित गावचे पोलीस पाटील व ग्राम समिती सतर्क झाल्या आहेत.