प्रतिनिधी / कोल्हापूर
शाहू सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध जाहीर होताच कारखान्याच्या नूतन संचालकांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आभार मानले. तसेच, मंत्री मुश्रीफ यांची केडीसीसी बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ व मिठाई देऊन अभिनंदनही केले. कोल्हापुरात कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर कारखान्याचे नूतन संचालक अमरसिंह घोरपडे, युवराज अर्जुना पाटील, प्रा. सुनील मगदूम व राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील- बामणीकर यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांची भेट घेतली.
दिवसभरात सकाळपासूनच या दोन्ही निवडीच्या घटना अत्यंत संथ गतीने सुरू होत्या. दुपारी दोननंतर या घटनांनी अचानक वेग घेतला. केडीसीसी बँकेसाठी अर्ज भरलेल्या समरजितसिंह घाटगे समर्थकांनी व शाहू साखर कारखान्यासाठी अर्ज भरलेल्या मुश्रीफ समर्थकांनी माघारीचे अर्ज या दोन्ही संस्थांचे निवडणूक अधिकारी अरुण काकडे यांच्याकडे सादर केल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला.
“प्रवीणसिंह भोसले यांचे कौतुक……”
यावेळी पालकमंत्री बंटी सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांचे कौतुक केले. शाहू साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात व केडीसीसी बँकेवर मंत्री मुश्रीफ यांचा बिनविरोधचा रस्ता मोकळा करण्यामध्ये श्री. भोसले यांनी समन्वय चांगला समन्वय घडवून आणल्याचेही पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.”