खुनी हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी
बेळगाव : शिंदोळी (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा भीषण खून करण्यात आला आहे. खुनी हल्ल्यात आणखी एक युवक गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गावात एकच खळबळ माजली आहे.
बसवराज बेळगावकर (वय 23) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून गिरीश नागुन्नवर (वय 23) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व शहरातील इतर पोलीस अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बसवराज व गिरीश यांच्यावर कोणी हल्ला केला? कोणत्या कारणासाठी केला? याचा मध्यरात्रीपर्यंत उलगडा झाला नाही. बेळगाव येथील बहुतेक पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सांबरा विमानतळावर होते. यावेळी ही घटना घडली आहे.
उपलब्ध माहितीनुसार शिंदोळी येथे नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धा संपून जाताना रात्री ही घटना घडली आहे. तीक्ष्ण हत्याराने झालेल्या हल्ल्यात बसवराज व गिरीश गंभीर जखमी झाले होते. सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना बसवराजचा मृत्यू झाला. गिरीशची प्रकृती चिंताजनक आहे. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.