कडीकोयंडा तोडून घरातील साहित्य लांबविले
प्रतिनिधी/ बेळगाव
शिंदोळी (ता. बेळगाव) येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 3 लाखाचा ऐवज लांबविला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
जितेंद्र जाधव-देसाई यांनी फिर्याद दिली आहे. ते मूळचे रायबाग तालुक्मयातील राहणारे असून सध्या शिंदोळी परिसरात त्यांचे वास्तव्य आहे. दीड महिन्यापूर्वी दि. 4 ऑक्टोबर रोजी आपल्या घराला कुलूप लावून ते गावी गेले होते. गुरुवार दि. 25 नोव्हेंबर रोजी ते शिंदोळीला परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून होमथिएटर, टी.व्ही., सोपासेट आदी सुमारे 3 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.