जिल्हय़ातील प्राथमिक शाळांमधील खळबळजनक प्रकार उघड
प्रतिनिधी/ चिपळूण
जिल्हय़ातील काही प्राथमिक शिक्षकांनी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्या-त्या गावातील काही तरूणांची मानधनावर नियुक्ती केल्याचा खळबळजनक प्रकार उघड होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी याची चौकशी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षण देण्यात अडचणी येत असल्यास वाडीवार जाऊन शिकवण्याच्या सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आल्याने मागील शैक्षणिक वर्ष तसे वायाच गेले आहे, तर नवीन वर्षाचे भवितव्यही अंधारात आले आहे. अशा काळात विद्यार्थ्यांची पाटी कोरी राहू नये म्हणून शासनाने बालवाडीपासून पुढे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची पध्दत आणली आहे. याची अंमलबजावणी काही हायस्कूलने सुरू केली आहे. मात्र विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसणे, नेटवर्क नाही अशा अनेक अडचणी येत आहेत. तरीही काही शिक्षक वेगवेगळे मार्ग अवलंबून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
असे असताना अनेक प्राथमिक शाळांमधील शिक्षक शाळांकडे फिरकतानाही दिसत नाहीत. अनेकजण आमच्या कोरोनासाठी डयुटया आहेत असे कारण देत आहेत. तर काही महिला शिक्षक स्वत:च्या दुचाकी असतानाही येण्या-जाण्यास बसेस नाहीत असे सागून शाळांमध्ये येणे टाळत आहेत. हे कमी की काय म्हणून जिल्हयातील काही शिक्षकांनी चक्क आपल्याला गावात जावे लागू नये म्हणून काही उच्चशिक्षित तरूणांची वाडीतील, गावातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नियुक्ती केली आहे. त्याना ते तुटपुंजे मानधन देत आहेत. कोरोनामुळे काहीही कामे नसल्याने तरूणांनी ही कामे घेतली आहेत.
मात्र हा गंभीर प्रकार शिक्षण सभापती मोरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱयांनी तसा पत्रव्यवहार आपापल्या तालुक्यातील केंद्र प्रमुखांकडे केला असून असा प्रकार गतवर्षी तसेच चालूवर्षी आपल्या तालुक्यात होतो आहे काय, याचा अहवाल मागितला आहे. या सर्वांचे अहवाल प्राप्त झाल्यावर ते जिल्हा शिक्षण विभागाकडे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे असे वागणाऱया शिक्षकांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
वाडीवार जा
ऑनलाईन शिक्षण देण्यात अनेक अडचणी येत आहेत अशी कारणे न देता आता तसे होत असल्यास वाडीवार जा, पण विद्यार्थ्यांना शिकवा अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे किती शिक्षण याचे पालन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.