घरामागील खुराडय़ातील कोंबडी फस्त : कोकिसरे पालकरवाडीतील घटना
वार्ताहर / वैभववाडी:
तालुक्मयातील कोकिसरे पालकरवाडी येथील रामचंद्र गावडे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या खुराडय़ातील कोंबडी बिबटय़ाने फस्त केली. ही घटना मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. गावडे यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून बिबटय़ाच्या मुक्त संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रामचंद्र गावडे यांच्या घरामागील पडवीत कोंबडय़ाचा खुराडा आहे. त्यातील एक कोंबडी गायब झाल्याचे गावडे यांच्या सकाळी लक्षात आले. रानातील ‘पटकुर’ (कांडेचोर) प्राण्याने ती कोंबडी नेली असावी, अशी शंका त्यांना आली. मात्र, गावडे यांचा मुलगा सिद्धू याने आपल्या घराबाहेरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता पहाटेच्या सुमारास सालवा डोंगराकडून बिबटय़ा घरातील पडवीत आल्याचे दिसले. बिबटय़ाने खुराडय़ातील कोंबडीवर झडप घातली व ती पळत असताना बिबटय़ाने तिची शिकार करून तो जंगल्याच्या दिशेने मार्गस्थ आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रामचंद्र गावडे यांच्या घरानजीकहून खांबाळे-कोकिसरे मार्ग जातो. गावडे यांनी रस्त्यावर स्वखर्चाने दिवाबत्तीची सोय केली आहे. ती दिवाबत्ती रात्रभर सुरू असते. उजेड असतानाही भरवस्तीत बिबटय़ा घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
वन विभागाला दिली माहिती
तावडे यांचे घर मुख्य पालकरवाडीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर आहे. तावडे यांच्या घरानजीक अजून तीन घरे आहेत. तावडे यांच्या घरात नवजात बालक व लहान मुलांसह 11 माणसे आहेत. घराच्या मागील पडवीत घुसून बिबटय़ाने कोंबडय़ाची शिकार केल्याच्या प्रकाराने तावडे कुटुंब भीतीच्या छायेखाली आहेत. या घटनेची माहिती वन विभागाला दिली असल्याची माहिती तावडे यांनी दिली.