प्रतिनिधी/ बेळगाव
शाळांची दसरा सुटी आज संपणार असून आता शिक्षकांची शाळा सुरू होणार आहे. 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील दसरा सुटी दि. 12 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान देण्यात आली होती. यामुळे शिक्षकांची शाळा शनिवार दि. 31 पासून सुरू होणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने शनिवारी महर्षी वाल्मिकी जयंतीचे आचरण तर रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव साजरा करण्यात यावा, असा आदेश दिला आहे. यामुळे प्रत्यक्ष शाळा सोमवारपासून सुरू होणार असल्या तरी आदेशानुसार जयंतीचे व कर्नाटक राज्योत्सवाचे आचरण करण्यासाठी शिक्षकांना शनिवारी व रविवारी शाळेत हजर रहावे लागणार आहे.
शैक्षणिक वर्षाची सुरुवातच विलंबाने झाली. विद्यागम तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा सुरू झाल्या. यामुळे दसरा सुटीबाबत संभ्रम होता. मात्र विद्यागमला स्थिगिती मिळताच दसरा सुटी देण्यात आली. यामुळे मागील चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांविना शाळेत हजर राहणाऱया शिक्षकांना 18 ते 20 दिवस सुटी मिळाली आहे. शनिवारी शाळेचा पहिला दिवस असून सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित रहावे, तसेच शाळेच्या एसडीएमसी सदस्यांच्या उपस्थितीत जयंती व राज्योत्सव साजरा करण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
सदर आदेशाची प्रत शाळा मुख्याध्यापकांना पाठविण्यात आली आहे. आदेशात जयंतीचे आचरण करताना महर्षी वाल्मिकी तर राज्योत्सव देवी भुवनेश्वरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे. एसडीएमसीला याबाबत कल्पना द्यावी. मात्र आजारी अथवा वयस्कर सदस्यांना कार्यक्रमाला येण्याची सक्ती करू नये. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर उपक्रमाचा अहवाल सीआरपीकडे देण्यात यावा, असे नमूद करण्यात आले आहे.