कोल्हापूर महापालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीचा राज्य शासनाला निवेदनाव्दारे ईशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फत शिक्षक व शिक्षणाचे मूल्यमापन केले जाते. यंदा मात्र खाजगी संस्थेमार्फत शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासंदर्भात शासनाने 30 कोटींची निविदा काढली आहे. ही बाह्य मूल्यमापनाची निविदा रद्द करा, निविदा काढणार्या अधिकार्यांवर गुन्हा नोंद करा, अन्यथा राज्यभर रस्त्यावरचे आंदोलन करणार, असा ईशारा कोल्हापूर महापालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला. हे निवेदन कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या नियमावलीमध्ये कर्मचार्यांची सेवा, किमान अर्हता, वेतन व भत्ते, सेवानिवृत्ती व त्यानंतरचे इतर लाभ रजा, कर्तव्ये व आचार संहिता, शिस्तविषय बाबी, कामाचे मूल्यमापन, कार्यभार संविधानिक तरतूदी करण्यात आल्या आहेत. या संविधानिक तरतूदींना फाटा देत 30 कोटी रूपयांची बाह्य निविदा काढून मूल्यमापनाव्दारे शिक्षकांचे वेतन वाढ ठरवणे 1977 ते 1978 चा अधिनियम व 1981 च्या सेवा शर्ती नियमांचे उल्लंघन करणारा निर्णय आहे. खासगी संस्थेमार्फत एका चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून शिक्षकांची वेतन वाढ देणे न देणे ठरवणे म्हणजे शासनाचाच शासनाच्या मूल्यमापनावर विश्वास नसल्याचा प्रकार आहे. शिक्षक भरती बंद करणे, शाळांना प्राथमिक सोयीसुविधा न देणे, शिक्षणावर 6 टक्के खर्च न करता साडेतीन टक्के खर्च करणे ही शासनाची चुक आहे. याकडे लक्ष न देता खासगी संस्थांना सांभाळणे नियमाच्या बाहेर आहे. यातून गरीबांचे शिक्षण संपवण्याचा राजकीय डाव असल्याचे दिसते. हा डाव आंदोलनाच्या माध्यमातून हाणून पाडणार. यावेळी मनपा शिक्षक संघटना कृती समितीचे राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, दिलीप माने, अमित वळवी, शिवाजी गुरव, राजेंद्र पाटील, संजय कडगावे, स्नेहलकुमार रेळेकर, राजेश कोंडेकर आदी उपस्थित होते.
शिक्षणमंत्र्यांना पदावरून खाली खेचू
माजी शिक्षणमंत्र्यांनी पाच वर्षात शिक्षणावर अनेक प्रयोग केले, त्यामुळे त्यांना यंदा आमदारकीचे तिकीटदेखील मिळू दिले नाही. विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांचे बाहÎमूल्यमापन निविदा मागे घेतली नाही तर शिक्षणमंत्री पदावरून खाली खेचत शिक्षकांचा हिसका दाखवू.
– राजेंद्र कोरे (विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ)