उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती, पदवीची चिंता न करण्याचा भाजपला सल्ला
पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुमारे 55 हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याकरिता शिक्षकांसाठी स्वतंत्र अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याची अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, माझ्या पदवीची चिंता भाजपने करू नये. पुण्यात शिकायला मिळाले, याचा मला अभिमान आहे. फालतू विषयांवरून टीका करू नका. खात्यात काम कसे करतो ते पहा, असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला.
उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर सामंत यांनी पुणे विद्यापीठाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर केले. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते.
सामंत म्हणाले, शिक्षणकांसाठी स्थापण्यात येणारी अकादमी पुण्यातच असेल. यात रोटेशन पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. येत्या महिन्याभरामध्ये कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाईल. तसेच येत्या 1 मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील, यासाठी प्रयत्न करू. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक पदाच्या 111 रिक्त जागांसाठी येत्या महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर शासनाने विद्यापीठांना घालून दिलेल्या निकषानुसार भरती प्रक्रिया पार पडेल. तसेच वित्त विभागाशी संबंधित 800 जागांच्या भरतीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल.
नगर आणि नाशिक उपकेंद्राच्या प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी विशेष लक्ष घातले आहे. नाशिकच्या उपकेंद्राचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे एका जागेवर विद्यापीठाचे काम आणि दुसऱया जागी राहण्याची व्यवस्था अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असे उपकेंद्राना सक्षम करण्याचे काम केले जाईल. 2012 पासून एकाही ग्रंथालयाला मान्यता देण्यात आलेली नाही. सध्या 12,219 ग्रंथालये आहेत. या गंथालयांना अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी एक समिती नेमली असून, त्यांच्या अहवालानंतरच ग्रंथालयांना अनुदान देण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
मी माझी पदवी लपवलेली नाही
मंत्रिपद स्वीकारल्यावर सामंत यांनी पुण्यातील कार्यालयाला भेट दिली. माझ्या पदवीवरून टीका होते आहे. मात्र, मला त्याचा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की मी ती कधीही पदवी लपवलेली नाही, हेही लक्षात घ्यावे. उलट पुण्यात शिकायला मिळाले, याचा मला आनंदच आहे, असे सामंत यांनी सांगितले.