प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 च्या संकटछायेत शिक्षकांना 31 जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमचा आदेश बजाविण्यात आला होता. मात्र, सदर आदेशाची डेडलाईन संपली असून शिक्षकांची शाळा सुरू होणार की पुन्हा घरी राहून काम करण्याचा आदेश बजाविण्यात येणार याबाबत शिक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या टप्प्यात शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करावे, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र 5 जूनपासून शिक्षकांची शाळा सुरू करण्यात आली होती.
मात्र, वाढता संसर्ग विचारात घेत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून वर्क फ्रॉम होम देण्यात आले होते. मात्र, आदेशात 31 जुलैपर्यंतची तारीख देण्यात आली होती. सदर आदेशाची तारीख संपली असून आता शिक्षकांना पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे. या कालावधीत शिक्षकांनी वार्षिक नियोजन, घटक नियोजनापासून विविध नवीन उपक्रम राबविण्यापर्यंतच्या योजना आखाव्यात. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत पुढाकार घ्यावा, याबाबतची माहिती देऊन वेळापत्रक देण्यात आले होते.
सदर कामकाजाचा कालावधी पूर्ण झाला असून शिक्षकांची शाळा सुरू होणार की पुन्हा बंदच राहणार याबाबत प्रतीक्षा आहे. याचे परिपत्रक दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून त्यावरच शाळांची प्रवेशद्वारे खुली होतील की नाही हे ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यात शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून सामाजिक अंतर राखत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांच्या कामाबाबतचा निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.