प्राथमिक शिक्षक समितीची जि. प. अध्यक्षांकडे मागणी
प्रतिनिधी / ओरोस:
शाळांमधील विलगीकरण कक्षातून व्यवस्थापकाचे कर्तव्य निभावणाऱया सर्व प्राथमिक शिक्षकांना कोरोना प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या गोळय़ा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेने जि. प. अध्यक्षा सौ. समीधा नाईक यांच्याकडे केली आहे. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सौ. सावी लोके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदी उपस्थित होते.
कोरोना बाधित क्षेत्रातून मोठय़ा संख्येने जिल्हय़ात आलेल्या आणि येत असलेल्या व्यक्तींपासून कोरोनाचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी त्यांना शासनाने गाव स्तरावर शाळाशाळांमधून व्यवस्था केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन केले जात आहे. या कक्षाचे व्यवस्थापक म्हणून प्राथमिक व माध्यमिक शिक्षक डय़ुटी बजावत आहेत. अशा शिक्षकांचा विलगीकरण केलेल्या लोकांशी कळत-नकळत सतत संबंध येत असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व होणारे संक्रमण टाळण्यासाठी, संबंधीत लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविणे व रोगापासून बचाव करणे आवश्यक आहे. एक उपाय म्हणून जिल्हा परिषदेमार्फत रोग प्रतिकारक गोळय़ांचे संबंधित सर्व कर्मचाऱयांना वितरण करण्यात येत आहे. शिक्षकांना अद्याप या गोळय़ांचे वाटप करण्यात आलेले नाही. याकडे लक्ष वेधण्यात आले. त्या लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, ज्ये÷ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, राज्य महिला सल्लागार सुरेखा कदम, जिल्हा महिला आघाडी संघटक कल्पना मलये, शिक्षक पतपेढी संचालिका नीलम बांदेकर, कुडाळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा संगीता राऊळ, सचिव सुजाता जडये आदी पदाधिकारी उपस्थित होते.