मिर्झापूर / वृत्तसंस्था
एका पाच वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेबाहेरच्या स्टॉलवर वर्गशिक्षकाची अनुमती न घेता ‘गोलगप्पे’ खाल्ले म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याला पहिल्या मजल्यावर उलटे टांगल्याची घटना उत्तर प्रदेशातील या शहरात घडली आहे. हा प्रकार पाहून इतर विद्यार्थ्यांची भीतीने गाळण उडाली होती. या मुख्याध्यापकाचे नाव मनोज विश्वकर्मा असे आहे. त्याच्याविरोधात तक्रार सादर करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. हा भीषण प्रकार येथील सद्भावना शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ शाळेत घडला. यामुळे या भागात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारचे व्हिडीओ चित्रण सध्या व्हायरल होत आहे. शाळेबाहेर जाऊन गोलगप्पे खाऊन हा विद्यार्थी शाळेत परतल्यानंतर मुख्याध्यापकाने त्याला धरले आणि पहिल्या मजल्यावर त्याला खाली डोके वर पाय अशा अवस्थेत उलटे टांगून धरले. ही घटना त्या विद्यार्थ्याच्या पालकांना समजल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार सादर केली. जिल्हय़ाच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱयानेही या प्रकाराची चौकशी केली. या मुख्याध्यापकाला त्वरित निलंबित करण्याची मागणी होत आहे