शिक्षण खात्याचे परिपत्रक : विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाईनच
प्रतिनिधी / पणजी
शाळा-उच्च माध्यमिक शाळामधील प्रशासकीय तसेच शिक्षकेतर कर्मचारीवर्गास येत्या सोमवार 7 जूनपासून कामावर हजेरी लावण्याचे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले असून शिक्षण संचालक डी. आर. भगत यांनी तसा आदेश काढला आहे. शिक्षण खात्याशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना-उच्च माध्यमिक शाळांना (अनुदानित, विनाअनुदानित) हा आदेश लागू असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठ शिक्षकांनी 7 जून तर कॉलेज शिक्षकांनी 8 जून पासून हजर व्हावे असे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. कॉलेज-विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने देखील सोमवार 7 जूनपासून कार्यरत व्हावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
एप्रिल-मे महिन्यात कोरोना महामारीचे संकट वाढल्यामुळे शाळा कॉलेज सर्व शिक्षक-शिक्षकेतर व इतर कर्मचारीवर्गास हजेरी लावण्यास प्रतिबंध करणारा आदेश जारी करण्यात आला होता. गेले सुमारे एक महिनाभर हा आदेश लागू होता. आता कोरोनाचे संक्रमणबळी कमी होत असल्याने सरकारने सर्व शाळा कॉलेजमधील शिक्षक, इतर कर्मचारी यांना कामाला लावले आहे.
त्या सर्वांना कामाला बोलावले असले तरी विद्यार्थ्यांना मात्र शाळेत, कॉलेजात बोलावू नये त्यांची शिकवणी व इतर कामे ऑनलाईन मार्गानेच करावीत, अशी सूचना दोन्ही खात्यातर्फे करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज, विद्यापीठ सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना मात्र तेथे हजेरी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.