ओटवणे/ प्रतिनिधी-
ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा मठ प्राथमिक शाळा नं. २ चे पदवीधर शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांची साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून “मानद डॉक्टरेट” या मानांकित पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. शिक्षण क्षेत्रातील या मानद डॉक्टरेट पुरस्काराचे वितरण चैन्नई येथे शनिवारी ४ सप्टेंबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
चंद्रकांत सावंत यांनी आपल्या शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरूवात फणसवडे सारख्या दुर्गम भागात करून सर्वांगिण कार्यातून त्या शाळेला जि प चा आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार मिळवून दिला. त्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना जागतिक, राष्ट्रीय, राज्य ते गाव पातळीपर्यंत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
चंद्रकांत सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्चप्राथमिक अशा ६५ शाळांमधील ८४ विद्यार्थीनी आणि ५ माघ्यमिक हायस्कूल मधील २५ विद्यार्थीनी मिळून एकत्रित ७० शाळांमधील १०९ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना तीन लाख चौवेचाळीस हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. तसेच स्मार्ट डिजीटल शाळा, कायम बक्षिस ठेव योजना, डिटीएच टिव्ही शाळा, मुलांना शुद्ध पेयजल , हँडवॉश स्टेशन , खेळाडू विद्यार्थि, ग्रामीण शाळा वर्गखोली लाइट फिटींग, शाळेसाठी स्कँनर प्रिंटर , दहावी प्रथम द्वितीय तृतीय कायमस्वरूपी बक्षिस ठेव योजना, निराधार मुलांना सहकार्य, नाट्यमंडळ, कलाकार यांना सहकार्य , बालिकांना वाढदिवस भेट, नवोदीत कवींना पुस्तक छपाई सहकार्य, गरजूंना सहकार्य, तसेच महिला व बाल बचतगट व स्थानिक मंडळे यांना आर्थिक मदत,
विद्यार्थीहित आदी उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत. चंद्रकांत सावंत यांनी समाजहितासाठी गेल्या दोन दशकापासून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.