कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा इशारा
प्रतिनिधी / ओरोस:
फेब्रुवारी महिन्यात शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत प्रलंबित प्रश्न एक महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन देऊनही अद्याप त्याची पूर्तता न झाल्याने 5 सप्टेंबर हा ‘शिक्षक दिन’ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकडून ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे, अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून देण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत अनेक आंदोलने करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी 18 फेब्रुवारी 2020 रोजी महासंघाच्या पदाधिकाऱयांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी त्यांनी या समस्या महिन्याभरात सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले होते.
त्यानंतर 13 एप्रिल, 23 एप्रिल, 2 मे, 16 मे, 23 जुलै, 10 ऑगस्ट, 28 ऑगस्ट रोजी मागण्यांबाबतची निवेदने देण्यात आली. दरम्यान 26 मे रोजी महासंघाच्यावतीने राज्यभरात आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र, अद्याप शासनाने यावर कोणताच तोडगा काढलेला नाही. त्यामुळे या कार्यपद्धतीविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांचे लक्ष वेधणारे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सादर केले आहे. मुल्यांकनपात्र घोषित शाळा, वाढीव तुकडय़ा तथा अघोषित शाळांना निधीसह घोषित करुन निधी वितरित करण्यात यावा. मागील एक दशकाहून अधिक काळ विनावेतन वाढीव पदावर कार्यरत शिक्षकांना पद मंजुरी व वेतन अनुदान द्यावे. मागील 20 वर्षांपासून विनावेतन कार्यरत आयटी शिक्षकांना त्वरित वेतन अनुदान द्यावे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्यांना जुनी पेन्शन लागू करावी.
राज्य शासकीय कर्मचाऱयांप्रमाणे 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. यासह चर्चा झालेल्या अन्य मागण्यांबाबत तातडीने आदेश काढण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष के. जी. जाधव, कार्याध्यक्ष एन. के. साळवी, सचिव डी. जे. शितोळे आदी उपस्थित होते.