जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची 8 हजार 50 पदे रिक्त
प्रतिनिधी / सातारा :
राज्यात इयत्ता पहिला ते आठवीच्या शिक्षकांसाठी प्रवेश पात्रता परीक्षेचे (महाटीईटी) 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन वर्षांनी ही परीक्षा होते. सन 2021 या वर्षात मंगळवार 3 ऑक्टोबरपासून परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात प्राथमिक विभागातील 8 हजार 50 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली. या पदांवरील भरतीकरीता टीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) काही बदल करण्यात आले आहेत. नव्या धोरणात पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांचे टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आल्याने टीईटीमधील बदलांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) समिती नियुक्त केली होती. इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टीईटी परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येणार आहेत. 1 ली ते 5 वी या वर्गासाठीच्या शिक्षकांना एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
परीक्षेचे वेळापत्रक
शिक्षण पात्रता परीक्षा पेपर 1 आणि 2 सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कलावधी 3 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 रात्री 11 वाजून 59 वाजेपर्यंत असणार आहे. 25 सप्टेंबर 2021 ते 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट घेता येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर हा 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळात होईल. तर दुसरा पेपर हा त्याच दिवशी दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 या वेळामध्ये होणार आहे.