प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक बदली प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविण्यात आला असून शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱया शिक्षकवर्गाकडून बदलीसाठी अर्ज करण्यात येत आहे. 30 नोव्हेंबर ही शिक्षक बदलीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार शिक्षक मित्र ऍपचा आधार घेत शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱया शिक्षकांनी अर्ज केले आहेत. बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून बदली प्रक्रिया जाहीर होताच शिक्षकांनी मोठय़ा प्रमाणात बदलीसाठी अर्ज केले आहेत.
शिक्षक बदली प्रक्रियेचे कौन्सिलिंग 16 डिसेंबरपासून करण्यात येणार असून याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. यामुळे शिक्षक अर्ज करण्यापासून त्यातील चुका तसेच अर्जांची पडताळणी, शिक्षक बदलीची यादी आणि यानंतर कौन्सिलिंग या टप्प्यात बदली प्रक्रिया पार पडणार आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी 16 डिसेंबर व 17 डिसेंबर रोजी कौन्सिलिंग होणार असून माध्यमिकसाठी 18 व 19 रोजी कौन्सिलिंग होणार आहे. यामुळे शाळा विद्यार्थ्यांविना भरत असल्या तरी शिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र पार पडणार आहे.
बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना जाणविणाऱया समस्या विचारात घेत प्रक्रिया सुरळीपणे पार पाडण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. संबंधित विभागनिहाय गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सदर हेल्पलाईनचा आधार मिळणार आहे. यामुळे शिक्षकांकडून रविवारअखेर बदलीसाठी अर्ज भरण्यात आले असून शिक्षक बदलीच्या यादीची आणि कौन्सिलिंगची प्रतीक्षा आहे.