संजय डी. पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार
प्रतिनिधी / वाकरे
पुणे शिक्षक मतदारसंघात यंत्रणेच्या तांत्रिक दोषामुळे सुमारे १० हजार पदवीधरांची नोंद शिक्षक मतदारसंघात झाली असून सदरच्या मतदारसंघातील पुरवणी यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी यादी दुरुस्ती व्हावी, अशी मागणी कोजिमाशी पतपेढीचे माजी चेअरमन संजय डी. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, शिक्षक मतदारसंघांमध्ये फक्त शिक्षकांना मतदान करण्याचा अधिकार आहे. पण पुणे शिक्षक मतदारसंघाची यादी पाहिल्यानंतर असे निदर्शनास येत आहे की, शिक्षक नसणारे अपात्र मतदार,जे लोक पदवीधर मतदार म्हणून मतदान करण्यास पात्र होते, त्यांची नावे शिक्षक मतदार यादीमध्ये नोंद झाली आहेत. यासंदर्भात संबंधित लोकांशी फोनवर चौकशी केली असता त्यांच्याकडून अशी माहीती मिळाली की, ते स्वतः पदवीधर मतदानासाठी मतदार म्हणून पात्र होते. मात्र, यंत्रणेच्या काही दोषामुळे मतदार यादीमध्ये नोंदले गेले आहेत. विशेष करून पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये अशा अपात्र मतदारांची संख्या १० हजाराच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघातील पुरवणी यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी ही दुरुस्ती व्हावी, तसेच त्यातील दोष काढून फक्त शिक्षक मतदारसंघांमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे, त्यांची नावे मतदार यादीमध्ये असावीत व त्यांनाच मतदान करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यांनी शिक्षक मतदार यादीतील पदवीधर मतदारांची ऑडिओ क्लिप आणि अपात्र मतदारांच्या नावाची १२ पाने सोबत जोडली आहेत.