कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्याचे काम
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हाधिकारी यांच्या नव्या आदेशानंतर आता शिक्षक कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहीमेवर जाणार आहेत. कोरोना रूग्ण संख्या अपलोड करण्याचे काम ही शिक्षक करत आहेत. या आकडय़ातील घोटाळा समोर आल्याने शिक्षकांच्या कामावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. यामुळे अपलोड घोटाळ्यातील शिक्षक नागरिकांना शोधण्याचे काम अचूकपणे करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गतवर्षीपासून सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांच्या शिकवणीचे तास कमी झाले आहेत. त्यात प्राथमिक विभागातील शिक्षक सुट्टीचा आनंद घेत आहेत. या शिक्षकांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश काढला आहे. या आदेशाने सर्वच शिक्षकांची झोप उडाली आहे. एकीकडे कोरोना बाधित रूग्ण संख्या अपलोड करताना घोटाळा झाला आहे. यात शिक्षक जबाबदार असून त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई नाही. तोच बाधित रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांची शोध मोहीम या शिक्षकांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
जिह्यात 20 हजार शिक्षक आहेत. ज्या गावातील शिक्षक आहे. त्याच गावात त्या शिक्षकाला कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे हे काम योग्य पद्धतीने करण्यासाठी शिक्षकांना नियम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.