प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊनवेळी शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी राबविण्यात आलेला ’विद्यागम’ कार्यक्रम पुन्हा राबविण्याची तयारी सार्वजनिक शिक्षण खात्याने चालविली आहे. राज्यात कोरोना प्रकरणांची संख्या वाढत जाऊन पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवल्यास कार्यक्रम राबविण्याची तयारी ठेवण्याची सूचना अधिकाऱयांना करण्यात आली आहे.
तूर्तास विद्यागम कार्यक्रम सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण कोरोना प्रकरणांची संख्या वाढून शाळा बंद करण्याची शिफारस तांत्रिक सल्ला समितीने केल्यास किंवा लॉकडाऊन जाहीर झाल्यास विद्यागम कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यागम कार्यक्रमाची तयारी ठेवावी, अशी सूचना सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्त डॉ. आर. विशाल यांनी केली आहे.
विद्यागमच्या वर्ग पद्धत- 1 मध्ये विद्यार्थ्यांना ऑफलाईनद्वारे शाळा आवारातच शारीरिक अंतर ठेवून पाळी पद्धतीने दररोज चार तासांच्या कालमर्यादेत शिकविले जाणार आहे. वर्ग पद्धत 2 आणि 3 मध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅब आदी संपर्क साधने असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीतील अशा विद्यार्थ्यांना आठवडय़ातून एकदा शाळेत बोलावून त्यांच्या अभ्यासाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येणार आहे.
डीसीईआरटीद्वारे देण्यात येणाऱया मार्गसूची आणि वेळापत्रकाप्रमाणे दूरदर्शनच्या चंदन वाहिनीवर प्रसारित होणारे पाठ वर्गनिहाय पाहण्यासाठीही विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाचा पुढील भाग विद्यार्थ्यांना उपलब्ध उपकरणांच्या आधारे म्हणजेच युटय़ूब, व्हिडिओ पाठ, संदेश, व्हॉट्सऍप आदी मार्गाने शिक्षण देण्यात येणार आहे. दीक्षा पोर्टलवर उपलब्ध असलेले पाठाचे सारांश डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रेडिओ कार्यक्रमामार्फतही अध्यापन करण्यात येणार आहे.
तीन ते सहा वर्षातील मुले (प्री-प्रायमरी), एक ते दोन, तीन ते पाच इयत्तांच्या मुलांना तीस मिनिटे, सहा ते आठ आणि नऊ ते दहा इयत्तांच्या मुलांना कमाल 30 ते 45 मिनिटांचे ऑनलाईन वर्ग घेण्याची सूचना केली आहे. प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांना प्रतिदिन एक सत्र, एक ते पाच इयत्तांच्या मुलांना दोन सत्रे, सहा ते आठ इयत्तांच्या मुलांना तीन आणि नऊ ते दहा इयत्तांच्या विद्यार्थ्यांना चार सत्रे घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
वेळापत्रकही तयार
कनि÷ प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) आणि उच्च प्राथमिक (पहिली ते आठवी) वर्गांसाठी विद्यागम किंवा पर्यायी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी वेळापत्रक शिक्षण खात्याच्यावतीने तयार केले आहे. पहिली ते तिसरी इयत्तांसाठी आठवडय़ातून दोन दिवस, चौथी ते पाचवी वर्गांसाठी आठवडय़ातील तीन दिवस, पाळी पद्धतीने प्रत्येकी पंचेचाळीस मिनिटांचे तीन तास निश्चित करण्यात आले आहेत.
उद्या बेंगळुरात बैठक
पुन्हा शाळा बंदची टांगती तलवार असल्याने ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग भरविण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षातही अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी मंगळवार दि. 11 रोजी बेंगळुरात ठराविक शिक्षकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बेळगावातून 24 शिक्षक बेंगळूरला
बेंगळूर येथे मंगळवार दि. 11 रोजी होणारी बैठक आणि प्रशिक्षण शिबिराला बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 24 शिक्षक उपस्थित राहणार आहेत. हे सर्व शिक्षक मराठी माध्यम शाळांचे असून त्यांच्यावर मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम अहवाल तयार करण्याची जबाबदारी असेल. खात्याच्या एकंदर हालचाली पाहता दि. 19 नंतर शाळा बंद केल्या जाण्याची दाट शक्यता आहे.