प्रतिनिधी / बेळगाव
दहावी निकालात बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाची सातत्याने घसरण सुरू आहे. परिणामी 2020-21 या शैक्षणिक वर्षात निकाल वाढीचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकले आहे. गतवर्षी 31 व्या क्रमांकासह बेळगाव शैक्षणिक जिल्हा ‘क’ श्रेणीत होता. यामुळे शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत अग्रेसर असणारा बेळगाव शैक्षणिक जिल्हा निकालात पाठीमागे असल्याचे अधोरेखित झाले होते. मात्र, 2020-21 या शैक्षणिक वर्षात निकाल वाढीसाठी बेळगाव जिल्हा शिक्षण विभाग सज्ज झाला असून प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहे. याकरिता शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क क्रमांक मिळविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
2019-20 या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे चार ते पाच महिने दहावी परीक्षा लांबणीवर पडली होती. परिणामी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी घसरली आणि जिल्हा थेट 31 व्या क्रमांकावर आला. मात्र, यावर्षीही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये व निकाल वाढावा यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याशी किमान एकदा किंवा दोनदा जिल्हा शिक्षण विभागाकडून संपर्क करण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचे मानसिक स्थैर्य वाढविण्याबरोबरच परीक्षेच्याबाबतीत टीप्स देण्यात येणार आहेत.
प्रथमच सदर उपक्रमाची अंमलबजावणी
कोविड-19 मुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बदल झाले. मे मध्ये सुरू होणारे दहावीचे शैक्षणिक वर्ष आता सुरू झाले आहे. जून महिन्यात परीक्षा होणार असून यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा तसेच त्यांची पूर्वतयारी व्हावी, मनोबल वाढावे यासाठी विद्यार्थ्यांचे शाळानिहाय संपर्क क्रमांक (मोबाईल क्रमांक) घेण्यात येत आहेत. सदर उपक्रमांतर्गत 50 टक्के काम पूर्ण झाले असून सर्व क्रमांक मिळताच प्रत्येक विद्यार्थ्याशी जिल्हा शिक्षण विभागाकडून संपर्क केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.