प्रतिनिधी/ कराड
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणाऱया लोकमान्य टिळकांच्या स्मृती चिरंतन राहावी, या प्रेरणेतून स्थापन झालेले शिक्षण मंडळ कराड हा या क्षेत्रातील गंगासागर आहे. या संस्थेने घडवलेले लाखो विद्यार्थी उच्च पदावर काम करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत. लोकमान्यांच्या स्मृती जागवणाऱया या संस्थेची आज शतकपूर्ती होत आहे, हा समाधान इच्छापूर्तीचा क्षण आहे, या पूर्तीतून ‘स्फूर्ती’ घेऊन माजी विद्यार्थी व समाजाच्या सहकार्याने संस्थेला स्वयंपूर्ण बनवूया, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले,
शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शतकपूर्ती निमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, शिल्पा वाळिंबे, उपाध्यक्ष मकरंद महाजन, उज्ज्वल लाहोटी, कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
नामदार बाळासाहेब पाटील यांनी टिळक हायस्कूलमधील शालेय जीवनातील अनेक आठवणी जागवत शिक्षण मंडळाच्या कार्याचा गौरव केला. माजी विद्यार्थी ऍपचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या ऍपच्या माध्यमातून अनेक माजी विद्यार्थी संस्थेशी जोडले जातील, असा आशावाद व्यक्त करीत संस्थेच्या सर्व उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य राहील, असे पालकमंत्री म्हणाले.
संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी, लोकमान्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा प्रयत्न संस्था करेल, असे सांगितले. संस्थेचे सचिव चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, सीबीएससीशाळा, कृष्णाकाठ स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट संस्थेने सुरू केले आहे. शताब्दी वर्षात प्लेसमेंट सेल संस्थेने सुरू केला असून या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. साठ कॉम्प्युटर्सनी सुसज्ज अशा परीक्षा केंद्राला एनइएसने मान्यता दिलेली असून जेईईसारख्या ऑनलाईन परीक्षा कराडला देता येतील.
माजी शिक्षक रमेश फणसळकर, माजी नामवंत विद्यार्थी प्रा. डॉ. माधव कुमठेकर, माजी विद्यार्थी शताब्दी समितीचे अध्यक्ष ऍड. सदानंद चिंगळे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना शाळेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. शतकपूर्तीचा प्रारंभ सकाळी प्रभातफेरीने करण्यात आला. शताब्दी महोत्सव समितीने विविध शाखांसाठी 100 झाडांची रोपे भेट दिली.
सूत्रसंचालन अनघा परांडकर यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी केले. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात देशभरातल्या माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.