दहावीच्या हॉलतिकीटवर परीक्षा केंदाचा अर्धवट पत्ता : विद्यार्थी-पालकांना मनस्ताप
प्रतिनिधी /बेळगाव
दहावीची परीक्षा सोमवार दि. 19 व गुरुवार दि. 22 रोजी होणार असल्याने काऊंटडाऊन सुरू झाले आहे. परंतु हॉलतिकीटवर अर्धवट पत्ता असल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटमध्ये अर्धवट पत्ता असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. ज्या ठिकाणी पत्ता आहे त्या ठिकाणी शाळा नसल्याने तो परिसर पिंजून काढावा लागत आहे. शिक्षण विभागाच्या सावळय़ा गोंधळामुळे विद्यार्थी व पालकांची फरफट होत आहे.
रखडलेली एसएसएलसीची परीक्षा दि. 19 व 22 जुलै रोजी होणार आहे. परीक्षेची हॉलतिकिटे शिक्षण विभागाने शाळांच्या लॉग ईन आयडीवर उपलब्ध करून दिली आहेत. 1 जुलैपासून शाळांमध्ये हॉलतिकिटे काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ती विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. अजूनही काही शाळांनी हॉलतिकीट विद्यार्थ्यांना दिलेली नसल्याने ती त्वरित देण्याची मागणी होत आहे.
हॉलतिकीट मिळाल्यानंतर काही विद्यार्थी व पालक परीक्षा केंद्र पाहण्यास गेले. परंतु त्या पत्त्यावर ते मिळालेच नाही. अखेर बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर इतर ठिकाणी परीक्षा केंद्र मिळाले. एका हॉलतिकीटवर किल्ला येथील शाळेचा पत्ता होता. परंतु त्या नावाची शाळा किल्ला येथे शोधली असता मिळालीच नाही. अखेर बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर ती शाळा प्रुट मार्केट येथील आझादनगर येथे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पालक व विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
विद्यार्थ्यांनी खातरजमा करून घेणे गरजेचे
परीक्षा अवघ्या 4 दिवसांवर आली असल्याने विद्यार्थ्यांनी गाफील राहून चालणार नाही. हॉलतिकीटवर देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेपूर्वी जावून खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा परीक्षेदिवशी अर्धवट पत्त्याच्या आधारे परीक्षा केंद्र शोधत राहिल्यास शैक्षणिक नुकसान होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जावून विद्यार्थ्यांनी खातरजमा करून घेणे गरजेचे बनले आहे.