प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील अतिरिक्त शिक्षक हनमंत वाघमारे यांना घरगडी बनवून त्याच्यावर अन्याय करणारे शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे यांची तत्काळ बदली करून चौकशी करावी आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी. या मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना दिले.
मनसेचे परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार आणि सांगली जिल्हा सचिव आशिष कोरी यांनी आडसूळ यांच्यासमोर कांबळे यांच्याबद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी कांबळे यांची तत्काळ बदली करून वर्ग १ च्या अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी केली जाईल, अशी ग्वाही अडसूळ यांनी दिली.
या निवेदनात म्हटले आहे कि, कोल्हापूर हायस्कुल कोल्हापुर येथून अतिरिक्त ठरलेले शिक्षक हनमंत वाघमारे यांना शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी आपला घरगडी बनवले आहे. हे प्रकार शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारे आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून सेवाज्येष्ठता असलेल्या शिक्षकाला कांबळे यांच्याकडून गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या शेतातील आणि घरातील कामे लावली जात आहत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर मनसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
चौकशी स्थगित करण्यासाठी कांबळे यांच्याकडून राजकीय दबाव
अतिरीक्त शिक्षक वाघमारे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक तक्रारी विस्तार अधिकारी कांबळे यांच्याविरोधात दाखल झाल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी या सर्व तक्रारी सीईओ अमन मित्तल यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून कारवाईच्या हालचाली सुरु आहेत. पण ही चौकशी स्थगित करण्यासाठी आर.व्ही.कांबळे यांच्याकडून मंत्र्यांसह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा सीईओवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कांबळे यांच्या चौकशीसह पुढील कारवाईस चालढकल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण येत्या दोन दिवसात त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेमध्ये मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे विजय करजगार व आशिष कोरी यांनी दिला आहे.