माजी विद्यार्थ्याकडून कृत्य : शिक्षिका समजून पतीवर ओतले पेट्रोल.केलेल्या शिक्षेचा काढला वचपा
वार्ताहर /केपे
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो. असंख्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य तो करतो. आपले विद्यार्थी आयुष्यात यशस्वी व्हावे यासाठी शिक्षकांची सतत धडपड सुरू असते. काहीवेळा विद्यार्थी बेशिस्त वागले तर शिक्षक विद्यार्थ्यांवर रागावतात. मात्र शिक्षकांचा हेतू हा वाईट नसतो. मात्र, असोल्डा-केपे येथे तब्बल 9 वर्षांनंतर एका माजी विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेने शालेय जीवनात दिलेल्या शिक्षेचा राग मनात धरून तिला जिवंत जाळून मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या विद्यार्थ्याला केपे पोलिसांनी अटक केली आहे.
उपलब्ध माहितीप्रमाणे, ज्या विद्यार्थ्यांने आपल्या शिक्षिकेला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला, त्या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळवून तो शाळेत प्रथम आला होता. या विद्यार्थ्यांने बीएससीपर्यंतचे शिक्षण घेतले असून तब्बल 9 वर्षांनंतर शालेय जीवनात शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेचा राग मनात धरून त्याने रात्रीच्यावेळी शिक्षिकेच्या घरात जाऊन तिला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला.
कुडचडे मतदारसंघातील असोल्डा-केपे येथे राहणाऱया एका निवृत्त मुख्याध्यापकाची पत्नी शेल्डे येथील सरकारी विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. याच शाळेतून काही वर्षापूर्वी शिकणारा माजी विद्यार्थी अभिषेक इरामत (25) राहणारा काकुमोड्डी याने रविवारी मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान शिक्षिकेच्या घराची कौले काढून आत प्रवेश केला व पर्समधील पैसे काढले व परत जाताना शिक्षिका समजून शिक्षिकेच्या पतीवर पेट्रोल ओतले व लाईटर घेऊन पेटविणार तोच पतीला (निवृत्त मुख्याध्यापक) जाग आली. त्यांनी त्याच अवस्थेत अभिषेकला पकडले व केपे पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अभिषेक इरामत याला ताब्यात घेतले.
अभिषेक इरामत याच्यावर केपे पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. आज मंगळवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. अभिषेकने दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळविले. त्यानंतर त्याने बीएससी बॉटनीपर्यंतचे शिक्षण घेतले असून सद्या तो लोडिंगचे काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2-3 वर्षापूर्वी अभिषेक इरामत याने त्या शिक्षिकेला मॅसेज पाठविण्याचे सत्र सुरू केले होते. त्यावेळी देखील केपे पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती. रविवारी रात्री त्याने चक्क पेट्रोल ओतून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पेट्रोल अंगावर पडल्याने शिक्षिकेच्या पतीला जाग आली आणि संभाव्य दुर्घटना टळली. हे प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पर्यंत पोचले असून मुख्यमंत्र्यांनी कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निवृत्त मुख्याध्यापकाचे नातेवाईक पाळी-कोठंबी येथे असून त्यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत नेले आहे.