वार्ताहर / बागणी
शिगाव ता. वाळवा गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण ( वय २३ ) यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये शिगाव गावचे सुपुत्र १ राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. चार महार येथून त्यांच्या सेवेला सुरवात झाली होती.
एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे १ राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झाले होते. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यानी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.
रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटीलसह साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे तर बहीण शिक्षण घेत आहे. शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावावर शोककळा पसरली आहे. पार्थिव रविवारी संध्याकाळी पर्यंत गावात येण्याची शक्यता आहे.