शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या जागा भरण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात सीपीएड, बीपीएड, एमपीएड झालेले विद्यार्थी शिक्षक भरती न झाल्याने बेरोजगार आहेत. सध्याच्या घडीला राज्यातील एक लाखाहून अधिक शारीरिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी बेरोजगार आहेत. 39 हजार शारीरिक शिक्षकांच्या जागा रिक्त असूनही भरती प्रक्रिया राबविली नसल्याने विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. त्यामुळे कर्नाटकात शारीरिक शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी राज्यातील बेरोजगारानी राज्य सरकारकडे केली आहे. या विद्यार्थ्यांनी शिट्टय़ा वाजवून आंदोलन केल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
बुधवारी सुवर्ण विधानसौध समोरील आंदोलनस्थळी या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. मागील पंधरा वर्षांपासून राज्य सरकारने शारीरिक शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे. यामुळे सीपीएड, बीपीएड, एमपीएड झालेले विद्यार्थी बेरोजगार आहेत. अनेकांचे वय संपल्याने त्यांना इतरत्र काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने रिक्त असलेल्या शालेय शिक्षण खात्याच्या जागा भराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. इतर शिक्षकांप्रमाणे शारीरिक शिक्षकांना सर्व सोयी सुविधा द्याव्यात, बेरोजगार विद्यार्थ्यांना तात्काळ तालुका शारीरिक अधिकारी व जिल्हा शारीरिक अधिकारी म्हणून नेमणुका द्याव्या, कोरोनामुळे मागील दोन वर्षात कोणतीही भरती प्रक्रिया राबवली गेले नसल्याने या विद्यार्थ्यांचे वय संपले आहे. त्यांना दोन वर्षे मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यभरातील शारीरिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.