नेटच्या समस्येमुळे चक्क झाडाखाली राहून कोरोना लसीकरणाचे ऑनलाइन नोंदणीसह व्हेरिफिकेशन
ओटवणे / प्रतिनिधी-
सरमळे गावात अतिदुर्गमस्थानी उंच टेकडीवर असलेल्या धनगर बांधवांच्या दुर्लक्षित शितपवाडीत नेटसह इतर समस्यावर मात करीत मंगळवारी अखेर लसीकरण करण्यात आले. घनदाट जंगलात डोंगरमाथ्यावर असलेल्या या धनगर समाजाच्या वस्तीत नेटची समस्या उद्भभवल्याने नेट मिळेल तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागली. यावेळी चक्क झाडाखाली राहूनही कोरोना लसीकरणाची ऑनलाइन नोंदणीसह व्हेरिफिकेशन करण्यात आले.
शितपवाडी कोरोना लसीकरणापासूनही वंचित होती. पवाहतुकीचे कोणतेही साधन नसल्याने ग्रामस्थ लसीकरणासाठी इतर ठिकाणी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे ओटवणे तलाठी भक्ती सावंत यानी याची तात्काळ दखल घेऊन तळकट आरोग्य केंद्राचे डॉ तुषार चिपळुकर यांचे याबाबत लक्ष वेधून या वाडीत लसीकरण करण्याची मागणी केली.
त्यानंतर डॉ तुषार चिपळूणकर यांनी तात्काळ कार्यवाही करून या वाडीत कोरोना लसीकरणाचे आयोजन केले. या कोरोना लसीकरणासाठी तांबुळी आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक एस. एस. कुबल, सेविका एस. एस. पालव, आशा स्वयंसेविका शितल सावंत यानी नियोजन केले.
यावेळी धनगर बांधवांनी तलाठी भक्ती सावंत आणि तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ तुषार चिपळूणकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.