वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी हॉकी इंडियातर्फे घेण्यात येणाऱया राष्ट्रीय वरिष्ठ महिला हॉकी संघासाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिराकरिता 25 संभाव्य महिला हॉकीपटूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.
अर्जेंटिनाच्या दौऱयानंतर भारतीय महिला हॉकी संघाला दोन आठवडय़ासाठी विश्रांती देण्यात आली होती. या विश्रांतीनंतर आता बेंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या केंद्रामध्ये (साई) राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर घेतले जाणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱया महिला हॉकीपटूंना काही दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.
रविवारी घोषित करण्यात आलेल्या 25 सदस्यांच्या वरिष्ठ महिला हॉकी संघामध्ये गोलरक्षक सविता, इ.रजनी आणि बिचूदेवी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दीप ग्रेस एक्का, रिना खोकर, सलिमा टेटे, मनप्रित कौर, गुरजित कौर, निशा, निकी प्रधान, मोनिका, नेहा, लिलिमा मिंझ, सुशिला छानू, नमिता टोप्पो, राणी, लालरेमसियामी, वंदना कटारिया, नवज्योत कौर, नवनीत कौर, रजविंदर कौर, ज्योती, शर्मिलादेवी, उदिता आणि रश्मिता मिंझ यांचा समावेश आहे. सदर राष्ट्रीय शिबीर 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे.