भव्य चित्ररथ, लयबद्ध रोमटामेळ पथके राहिले मुख्य आकर्षण, लोकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती
प्रतिनिधी /मडगाव
‘ओस्सय…ओस्सय’चा गजर करत लयबद्ध पद्धतीने नृत्य करणारी रोमटामेळ पथके, पौराणिक कथांवर आधारित व संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथ आणि या कलाकौशल्याला व अदाकारीला दाद देणारे रसिकजन यांच्या सानिध्यात रविवारी मडगाव शिमगोत्सव समितीने फातोर्डा येथे आयोजित केलेली शिमगोत्सव मिरवणूक पार पडली.
‘विठेवरी उभा कटेवरी हात’ यासारखी शिमगोत्सवातील पारंपरिक गीते गात मार्गक्रमण करणारी रोमटामेळ पथके व त्यांना साथ देणारे ढोलताशे यांनी फातोर्डातील आसमंत दणाणून सोडले. रात्री उशिरा सुरू झालेल्या पौराणिक कथांवर आधारित आकर्षक चित्ररथांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केलेल्या प्रेक्षकांच्या डोळय़ांचे पारणे फेडले. स्थानिक गोमंतकीय तसेच देशी-विदेशी पर्यटकांनी या शिमगोत्सव मिरवणुकीला गर्दी केली होती. रविवारी सायंकाळी फातोर्डातील कोलवा सर्कल येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोरील रस्ता ते रवींद्र भवनमार्गे दामोदर देवस्थानापर्यंत ही मिरवणूक चालली.
विविध पथकांनी सादर केलेली घोडेमोडणी व अन्य लोकनृत्येही या मिरवणुकीचे एक आकर्षण राहिले. यात श्री सरस्वती कलामंडळ, केळबाय-कुर्टी, नवदुर्गा कला व सांस्कृतिक मंडळ, मडकई व इतरांनी वाहवा मिळविली. त्याशिवाय वेशभूषा स्पर्धाही झाली. या शिमगोत्सव मिरवणुकीला मडगाव शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष असलेले नगरसेवक रवींद्र (राजू) नाईक, समितीचे सरचिटणीस नगरसेवक सिद्धांत गडेकर व खजिनदार नगरसेविका पूजा नाईक, अन्य नगरसेवक उपस्थित होते.
या मिरवणुकीने मडगाव शिमगोत्सव समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची सांगता झाली आहे. समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना शुक्रवार सायंकाळपासून सुरुवात झाली होती. त्याअंतर्गत शुक्रवारी व शनिवारी पालिका इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कला पथकांनी आपली कला पेश केली होती. त्यात मुंबई येथील पथकाने सादर केलेला मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम, जगदंब ढोल-ताशा पथकाचा कार्यक्रम तसेच समईनृत्ये, लावणीचा कार्यक्रम, युनिटी नृत्य पथकाची नृत्ये आदींचा समावेश राहिला होता.
सर्वांना एकत्र घेऊन शिमगोत्सव साजरा : सरदेसाई
परंपरेला फाटा देताना यापूर्वी काही राजकारण्यांनी दोन शिमगोत्सव मडगावात साजरे केले होते. यंदा आम्ही सर्वांना एकत्र घेऊन शिमगोत्सव साजरा केलेला असून यातून एकतेचा संदेश पुढे जायला हवा, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
आमदार कामतकडून शिमगोत्सव समितीचे अभिनंदन
मडगावात दामबाबाच्या स्थळात दोन शिमगोत्सव चालत नाहीत, असे सांगून यंदा पालिका आणि शिमगोत्सव समितीने एकत्र येऊन शिमगोत्सव साजरा केल्याबद्दल मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी समितीचे अभिनंदन केले. चांगल्या प्रकारे कार्यक्रम निवड व आयोजन केल्याबद्दल समिती सदस्यांची त्यांनी स्तुती केली. महामारीमुळे मागील दोन वर्षे शिमगोत्सव साजरा करणे शक्मय झाले नव्हते. यंदा पुन्हा सुरुवात झाली असल्याने सरकारने पाच ठिकाणी आयोजन केलेले असले, तरी पुढे अन्य भागांत जसे आयोजन करण्यात येत होते तसे करणे गरजेचे असल्याचे कामत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.