ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला मध्ये मास्क न घालता कोणी बाहेर आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारात मास्क घातलेला व्यक्ती आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून एक हजार रुपये दंड वसूल केला जाईल, असे आदेश उपजिल्हाधिकारी अमित कश्यप यांनी गुरुवारी दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे दंड वसूल करणारा शिमला हा हिमाचल प्रदेशातील पहिला जिल्हा ठरला आहे. हिमाचल प्रदेश सरकार कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करता यावी यासाठी नवीन कायदा बनवणार आहे. परंतु अजून या कायद्यासंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय झाला नाही आहे. परंतु उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात हा दंड लागू केला आहे. अनलॉक च्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा दंड जारी करण्यात आला आहे.
हा दंड सर्वांना लागू असून जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात जे कोणी मास्क न लावता बाहेर पडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. हा निर्णय सर्व सामान्य लोकांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे यासाठी घेण्यात आला आहे. मास्क लावताना नाक आणि तोंड झाकणे आवश्यक आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.