वार्ताहर / शिये
कोरोना काळात सलुन दुकान व ब्युटीपार्लर बंद असल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे सरकारने दृर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शिये (ता.करवीर) येथील नाभिक संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून राज्यातील सलून व पार्लर दुकाने बंदचा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला आहे. त्यामुळे व्यवसाय बंद असल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी सलून दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी. किंवा नाभिक समाजाला तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. सोशल डिस्टन्स पाळुन नाभिक संघटनेने काळया फिती लावुन काम बंद करून राज्य सरकारचा निषेध केला तसेच चिनी कॉस्मेटिक आणि साहित्यावर बहिष्कार टाकला.
हे आंदोलन जिल्हा अध्यक्ष सयाजी झुंझार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी नाभिक संघटनेचे तानाजी संकपाळ, निवास फडतारे, विजय फडतारे,संतोष फडतारे, महेश फडतारे, रमेश फडतारे, नेताजी फडतारे,पुरुषोत्तम फडतारे, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.