प्रतिनिधी /डिचोली
शिरगाव पंचायतीच्या सरपंचपदी अपेक्षेप्रमाणे भगवंत भास्कर गावकर यांची बिनविरोध निवड झाली. काल सोम. दि. 8 नोव्हे. रोजी झालेल्या निवडणुकीत भगवंत गावकर यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध वर्णी लागली. शिरगाव पंचायतीच्या रिक्त सरपंच पदाची निवड करण्यासाठी काल सोमवारी सकाळी पंचायत मंडळाची बैठक घेण्यात आली.
शिरगाव पंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या विशेष बैठकीस पाचपैकी उपसरपंच सौ. विजया मांदेकर यांच्यासह भगवंत गावकर, सदानंद गावकर आणि कल्पता घाडी हे चार पंचसदस्य उपस्थित होते. तर पदच्य?त सरपंच अच्य?त गावकर अनुपस्थित होते. सरपंच पदासाठी भगवंत गावकर यांनी एकटय़ानेच अर्ज भरला. या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून अनुक्रमे सदानंद गावकर आणि विजया मांदेकर यांनी सही केली होती.
निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले डिचोली गट विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी प्रतापराव राणे यांनी हा अर्ज ग्राह्य धरून भगवंत गावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पंचायत सचिव स्वप्नज पेडणेकर यांनी सहकार्य केले. यापूर्वी सरपंच म्हणून पदभार सांभाळल्यानंतर भगवंत गावकर यांच्याकडे सरपंचपदाची धुरा पुन्हा आली असून पंचायतीतर्फे गावच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेली सर्व कामे पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार. तसेच सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या कामांचा पाठपुरावा करून ती पुर्णत्वाकडे नेण्यासाठी कटिबद्ध राहणार. तसेच सर्व पंचसदस्यांना विश्वासात घेऊन कोणत्याही भेदभावाशिवाय काम करणार, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच भगवंत गावकर यांनी व्यक्त केली.