प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी जवळच्या पुलावर सिमेंट वाहतूक बल्करच्या जोरदार धडकेतदुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महादेव काशिनाथ आलदी वय ४५ रा.आदर्श नगर,कुमठा नाका, सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, अक्कलकोट- आळंद रस्त्यावरील शिरवळवाडी जवळील पुलावर भरदाव येणाऱ्या सिमेंट वाहतूक बल्कर क्र. एम. एच. १२ आर. एन. २३७५ चालक योगीराज श्रीशैल मठपती, रा. स्टेशन रोड, समतानगर, अक्कलकोट यांने स्कुटी दुचाकी क्र. एम. एच. १३ ए. ई. १०७३ ला जोरदार धडक दिल्याने महादेव काशिनाथ आलदी (वय ४५ ) रा.आदर्श नगर, कुमठा नाका, सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला. या पुलावर मोठा खड्डा पडला असून खड्याचा अंदाज न आल्याने पाठीमागून येणाऱ्या भरदाव सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्करने चिरडले यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत आलदी हे सोलापूरहुन आळंद जि. गुलबर्गा येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. आळंदहुन सोलापूरकडे निघाले असता शिरवळवाडी जवळ हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी २५ फूट लांब जाऊन पडली होती. तर मयत आलदी यांच्या पोटावरून चाक गेल्याने चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
मयत आलदी यांचे प्रेत रुग्णवाहिकेतून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून सकाळी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहेत. चालक योगीराज मठपती हा स्वतःहून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात हजर झाला असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, पोलीस हवालदार सलीम पिरजादे, पो कॉ. शिवलिंगय्या स्वामी, पो कॉ. राम चौधरी, सीताराम राऊत, रणजित अवताडे उपस्थित होते.