प्रतिनिधी / खंडाळा :
वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील खेळाडूंना पुढील ध्येय गाठण्यासाठी सरावाची सुविधा असणे गरजेची होती. ही बाब लक्षात घेऊन खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रीडा संकुलासाठी राज्य शासनाकडून 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली .
खंडाळा तालुक्यातील नवोदित खेळाडूंना विविध खेळांचा सराव करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच ग्रामीण भागातील खेळाडू राज्य व देशपातळीवर पोहचण्यासाठी सुसज्ज क्रीडा संकुलाला मंजूरी घेण्यात आली होती. त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून घेणे या प्रक्रियेसाठी काही कालावधी गेला होता. मात्र, जागेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्या जागी भव्य कीडा संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. या जागी सुसज्ज बंदिस्त प्रेक्षागृह उभारण्यासाठी शासनाच्या वतीने 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, कराटे, बॅडमिंटन, कुस्ती, बॉक्सिंग, तसेच इतर खेळ खेळण्याच्या सरावास मदत होणार आहे.