इस्लामपूर/प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील शिरसी येथील दोन दरोडयातील आरोपी धरम उर्फ तडीतिपडया पितांबर शिंदे उर्फ काळे (मुळ रा.हुबालवाडी, ता.वाळवा, सध्या पुनवत, ता.शिराळा) याला दोन गुन्हयात प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर जीन पाक्षा काळे या संशयीताची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश शेखर मुनघाटे यांनी ही शिक्षा दिली.
दि. १९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास शिरसी येथील सुनंदा अशोक शिरसट व हरीबा आनंदा महिंद यांच्या घरात आरोपी धरम याच्यासह पाच ते सहा जणांनी प्रवेश केला. सुनंदा यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळयातील मंगळसूत्र काढून घेतले. तर लोखंडी पेटीतील सोन्याचा गोफ, कानातील वेल, कर्णफुले, अंगठ्या, चांदीचे पैजण, मोबाईल असा सुमारे ६८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. तर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हरीबा महिंद यांच्या घरात पाच ते सात जणांनी प्रवेश करुन कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्या आईच्या कानातील कर्णफुले, बहिणीला धाक दाखवून तिच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल, असा सुमारे ३० हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबवला.
याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये ही टोळी उघडकीस आली. पोलीसांनी धरम शिंदे याच्यासह जीन काळे या दोघांना अटक केली. तर अन्य संशयीत आरोपी अद्याप पोलीसांना मिळालेले नाहीत. या खटल्यात सरकार तर्फे सहा. सरकारी वकील रणजीत सुरेश पाटील यांनी काम पाहिले.