प्रतिनिधी / शिराळा
कणदूर ता. शिराळा येथे तांबुळ नावाच्या शेतात संपत सदाशिव पाटील यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले आहे .बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी कणदूर येथून नदीकडे जाणाऱ्या पाणंदीला तांबुळ नावाच्या शेतात संपत सदाशिव पाटील यांची जनावरांची वस्ती आहे. वस्तीत लहानमोठी सात जनावरे आहेत. शनिवारी मध्यरात्री बिबट्याने या वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात एक वासरू ठार झाले. बिबट्याने वासराला मक्याच्या शेतात ओढून नेवून त्याचा फडशा पाडला. मक्याच्या शेतात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. घटनास्थळी वनरक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी धनंजय कदम, मारुती पाटील यांनी भेट देवून पंचनामा केला आहे.