शिराळा / वार्ताहर
शिराळा येथील वीज वितरणाच्या कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांनी तसेच महीलांनी सुमारे एक तास टाळे ठोकले होते. यावेळी वीज वितरणाच्या अधिकाऱ्याच्या व कर्मचारी यांच्या मनमानी व उद्धट कारभाराला कंटाळलेल्या महीला व शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन मुख्य अभियंता पी.एम.बुचडे यांना घेराव घातला होता.
यावेळी शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीची लाईन सध्या कापरीच्या डिपीवरुन जोडलेली आहे. ती लाईन शिराळा शहरातील डिपीवरुन जोडण्याच्या मागणीसाठी महिला मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या. तर वाकुर्डे खुर्द, वाकुर्डे बुद्रुक, अंत्री खुर्द या गावांमध्ये वारंवार घरगुती व शेती पंपाची लाईट खंडीत होत आहे. याबाबत या गावातील शेतकरी व ग्रामस्थं मोठ्या प्रमाणात हजर होते. तर एकाच वेळी शिराळा येथील महीला व उत्तर भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ वीज वितरणाच्या कार्यालयात जमा झाल्याने विज वितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.
शिराळा उत्तर भागातील वाकुर्डे खुर्द व वाकुर्डे बुद्रुक अंतरी खुर्द गावांमध्ये गेल्या चार दिवसांपासून म्हणजे दिनांक १० पासुन ते बुधवार दिनांक १३अखेर घरगुती वीज व शेतीपंपाची विज पुर्णपणे बंद असून याबाबत शिराळा व शिरसी सबस्टेशनला विचारणा केली असता संतापजनक व उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकरी व ग्रामस्थ यांना वेठीस धरले जात आहे. तरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असुन त्यास महावीज वितरण सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन मुख्य अभियंता बुचडे यांना देण्यात आले.
तर शिराळा शहरातील प्राध्यापक कॉलनी येथील ७० टक्के घरातील लाईट कनेक्शन कापर डिपीवरुन जोडण्यात आली आहे. त्यामुळे येथे वारंवार विजपुरवठा खंडित होत असून लोडशेडींगचा नाहक त्रास येथील लोकांना सोसावा लागत आहे. तसेच लोडशेडींग चालू असताना ही दिवसा व रात्री लाईट सतत जात आहे. त्यामुळे येथील व्यवसायाकांना सुध्दा अतिशय त्रास होत आहे. याबाबत महावीज वितरणाच्या अधिकार्यांनी त्वरित लक्ष द्यावे अन्यथा असंतोषाला सामोरे जावे लागेल असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिराळा प्राध्यापक कॉलनी मधील नगरसेविका सीमा कदम, सरोजिनी कदम, रुपाली कदम, संगीता पाटील, सविता माळी, राजश्री पाटील रोहीनी कवठेकर, सुनिता घागरे, शोभा पाटील, दिपा घोलपे, सुनिता नाईक, वैजयंती गिरी आदीं महिलांसह शिराळा उत्तर भागातील शिवाजी पाटील, दिनकर पाटील, सचिन केसरकर, सचिन पाटील, अश्विन पाटील, शंकर मुळीक जालिंदर पाटील, सुनिल इंगळे, ओंकार पाटील, संदेश पाटील, विनायक पवारांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.