शिराळा / वार्ताहर
शिराळा शहरात शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात येत असुन पोलीस प्रशासनाने तंतोतंत नियोजन केले आहे. तर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी जनता कर्फ्युचे ही पुरेपालन केले आहे . संपूर्ण शहरात आज दिवसभर सगळीकडे पूर्णपणे शुकशुकाट होता. नागरिकांनी या संचारबंदी मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. काही ठराविक सेवा वगळता इतर कोणतेही वाहन रस्त्यावर पहावयास मिळत नाही. शिराळा शहरातील ग्रामस्थांनी लॉकडाऊनचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.
शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी शहरात पहाटे पासुनच कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना लाँकडाऊनच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. याला नागरिकांनी ही सहकार्य केल्याने संपूर्ण शहरात निर्मनुष्य वातावरण तयार झाले आहे.
शहरासह तालुक्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विनाकारण फिरणाऱ्या वाहन धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिराळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाचे २५ रूग्ण पॉझिटिव्ह दाखल करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी हि बंदोबस्त आहे. तर शिराळा येथील नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर अंबामाता मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस फौजदार सुप्रिया धुरंदे, विनोद पाटील, अभिजित पवार, नगराध्यक्षा अर्चना शेटे, मुख्याधिकारी योगेश पाटील, उपनगराध्यक्ष किर्ती कुमार पाटील, बांधकाम सभापती सुनिता निकम, नगरसेवक केदार नलवडे, वैभव गायकवाड, सीमा कदम, यांनी प्रशासनाला सहकार्य करावे व नागरिकांनी लॉकडाऊन पाळवा असे आवाहन केले आहे.