सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
शिरोडा येथील कामाक्षी कलावर्धीनी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या अखिल गोवा पातळीवरील अभंग गायन स्पर्धेत हर्षा गणपुले यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. संस्थेच्या गंगानगर येथील सभागृहात ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक अवी परवार यांना तर मयांक नाईक यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. प्राजक्ता च्यारी, गार्गी सिद्धये व कृष्णा सुर्लकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण सोहळय़ाला सरकारी अधिकारी निलेश गावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुंबईस्थित संवादिनी वादक मोहन शिरोडकर, परीक्षक दुर्गाकुमार नावती, श्रीकांत शिरोडकर, पंचसदस्य सुहास नाईक, संस्थेचे अध्यक्ष रतनजी बेतकीकर, गोकुळदास नाईक व प्रतिक नाईक उपस्थित होते.
संस्कारक्षम जीवन जगण्यासाठी संगीत हे उत्तम साधन असल्याचे निलेश गावकर यावेळी म्हणाले. संगीत हे शास्त्र आहे. केवळ सूर-तालाचे ज्ञान हे संगीत शिक्षणासाठी पुरेसे नसून डोळसपणे साधना करणारा कलाकारच या क्षेत्रात यशस्वी ठरतो, असे दुर्गाकुमार नावती म्हणाले. मोहन शिरोडकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. स्पर्धकांना गोकुळदास नाईक यांनी संवादिनीवर तर प्रतिक नाईक यांनी तबलासाथ केली. रतनजी बेतकीकर यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गाकुमार नावती यांनी गायिलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.