बोरीत नवदुर्गेच्या भेटीला तर शिरोड्यात शिवनाथ देवाच्या भेटीला
फोंडा : शिमगोत्सवाच्या चतुर्दशीत ‘सोप्यावयले आजे तू किते पळयेता…बा रे नातवा शिगमो पळयता….!!!!!.य आधुकि जतीसह कटर.. घणचे कटर घण…शब्बैय… शब्बैय बले… बले.. शब्बैय ओसोय्यऽऽऽ…..ओसोय्यऽऽऽ…या पारंपरिक जती गात, अंत्रुज महालाला दुमदुमून टाकणाऱ्या वादनाच्या तालावर उत्साहपूर्ण माहोलात शिरोड्यातील चतुर्दशीत हजारो शिमगोप्रेमींच्या साक्षीत उत्साहपुर्ण वातावरणात पार पडली. अंत्रुज महालातील बोरी व शिरोडा भागात ग्रामदेवताना नमन घालून शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे. काल रविवारी बोरी व शिरोडा येथे चतुदर्शी उत्सवाने ढोल ताशांचा आवाज दुमदुमून गेला. वर्षपद्धतीप्रमाणे शिरोडा येथील शिवनाथ देवाच्या भेटीला डोंगर शिरोडा येथील वाघ्रोसिद्ध रामटामेळ पथक उत्सवी मुडमध्ये सहभागी झाले होते तर बोरी भागातील शिमगोप्रेमींनी देवी नवदुर्गेचा आशिर्वाद घेतला. ढोलताशांच्या गजरात पारंपरिक गीतांवर पदन्यास करणाऱ्या रोमटामेळ पथकांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. रोमटामेळ, लोकनृत्य, फेटेदारी ढोलताशा पथकांसह लहान मोठे थिरकत होते. डोक्यावर फेटा, शिवाजी टोपी, चेहऱ्यावर विविध प्रकारचे मुखवटे, हातात दांडे, गुडी, दोज, छत्री, तोरण अशा विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू व शत्रे घेऊन वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून नाचत लोकांचे मनोरंजन करीत शिरोडा येथील शिवनाथीच्या मंदिराकडे नमन घालण्यासाठी शिरोडा भागातील रोमटामेळ सहभागी झाले होते. लहान बालगोपाळांसह शिमगोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील शिमगोप्रेमींनी चतुर्दशी उत्सवाचा आनंद लुटला.