ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासह आंगणवाडी केंद्र देखील बंद ठेवली जाणार आहेत. त्यातच शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
सुखबीर बादल यांनी चंदीगडमध्ये आपली कोरोनाची चाचणी करून घेतली. तिथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरवर आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुखबीर बादल यांनी पैतृक गावातील आपल्या घरी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.