पुलाची शिरोली / वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा. अशी मागणी विरोधी ग्रामविकास आघाडीच्या सदस्यांनी हातकणंगले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिरोली गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित गावांपैकी एक आहे. औद्योगिक वसाहत, पेट्रोल पंप, हॉटेल व्यवसाय, व्यापारी, मोठमोठी गोडावून, लक्षणीय विद्यार्थी संख्या. असे सगळे असताना गेली वर्षभरात पाच ते सहा ग्रामविकास अधिकारी आले आणि गेले. यामुळे ग्रामस्थांची अनेक प्रकारे गैरसोय होत आहे. तसेच लोकप्रतिनिधींना गावगाडा चालवायला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी शिरोली गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची निवड करुन गैरसोय टाळावी, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली आहे. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी लवकरच कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, बाबासाहेब कांबळे, डॉ. सुभाष पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बबन संकपाळ, माजी उपसरपंच कृष्णात करपे, सलिम महात, विनायक कुंभार आदी उपस्थित होते.
दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिरोली गावात आल्यानंतर अनेक विकास कामांच्या घोषणा केल्या आहेत. वस्तुस्थिती पहाता त्यांच्या या पोकळ घोषणा ठरल्या आहेत. त्यांनी गावात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देवून आपली नैतिकता पार पाडावी. अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.