पुलाची शिरोली/ वार्ताहर
मास एक्स्प्रेस कार्गो लि. पुणे या कंपनीचे शिरोली एमआयडीसी येथील टोप हद्दीत असणारे गोडाऊन फोडून सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या पाच जणांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली. शुभम संजय मिठारी, रितेश तानाजी कांबळे, अक्षय संजय कांबळे (तिघेही रा. नागाव, ता. हातकणंगले), शुभम नंदकुमार गव्हाणे व आदित्य भिकाजी पाटील (रा. महाडीक कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. उमेश गोपाळ मरगज (वय ३०, रा. आर. के. नगर, कोल्हापूर) यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत माहिती अशी की, टोप (ता. हातकणंगले) हद्दीतील इंदिरा झोपडपट्टी जवळ मास एक्स्प्रेस कार्गोचे गोडाऊन आहे. या गोडाउन मध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास गोडाऊनचे शटर उचकटून सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले होते. याबाबतची फिर्याद गोडाऊनचे कर्मचारी मरगज यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.
फिर्याद दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली. दरम्यानच्या काळात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुलाची शिरोली येथील साई मंदिर समोर एका मोटारीतून काहीजण कपडे विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथे तत्काळ पोलिसांनी जाऊन अधिक चौकशी केली असता, सदरचे कपडे हे मास एक्स्प्रेस कार्गो च्या गोडाऊन मधून चोरीला गेलेलेच असल्याचे निष्पन्न झाले. यासाठी शुभम मिठारी याने आपल्या वडिलांची इको मोटार ( एमएच ०९ एफक्यू ७४४१ ) चा वापर केला असल्याचे सांगितले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे व डिवायएसपी आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.राजेश खांडवे, पोलिस कर्मचारी सतिश जंगम, अविनाश पोवार, समिर मुल्ला व प्रविण काळे यांनी केली.