प्रतिनिधी / इचलकरंजी
शिरोळ तालुक्यातील चिंचवाड व अब्दूललाट या ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी धाड टाकली. यामध्ये विविध कंपन्यांच्या 179 विदेशी, 2476 देशी दारुच्या बाटल्यांसह 50 लिटर गावठी दारू व एक दुचाकी जप्त करण्यात आली. या कारवाईत दुचाकीसह एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका महिलेसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 8 जणांना ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पी. आर. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करत विविध प्रकारचे 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.