शिरोळ / प्रतिनिधी
येथील पंचायत समितीच्या सभापती सौ कविता चौगुले यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा देणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे विनंती करण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान सभापती कविता चौगुले यांच्याशी संपर्क साधलाअसता त्या म्हणाल्या की अध्याप नेत्यांचा आदेश आलेला नाही त्यामुळे आताच मी राजीनामा बाबत बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिरोळ तालुका पंचायत समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची महाविकास आघाडीची सत्ता आहे. आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे प्रत्येक सदस्यांना संधी मिळावी म्हणून नेतेमंडळींनी सहा महिन्याचा कार्यकाळ ठरविण्यात आला आहे. या पंचायत समितीचे सभापती पदे सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे.
शिवसेनेच्या सदस्या सौ. कविता चौगुले यांची 6 ऑगस्ट 2020 रोजी सभापतीपदी निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली होती. सचिन शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता या रिक्त झालेल्या जागेवर स्वाभिमानीचे राजगोंडा पाटील यांची उपसभापती पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
विद्यमान सभापती सौ. कविता चौगुले यांचा आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपला असून त्यांच्या राजीनामाकडे इच्छुक डोळे लावून बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या सौ दिपाली परीट यांना सभापतीपदाची संधी मिळणार आहे. विद्यमान सभापती सौ. कविता चौगुले यांनी यापूर्वी उपसभापती पदावर काम केले आहे. आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे विद्यमान सभापती कविता चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार का याबाबतची चर्चा सुरू आहे.