शिर्डी / प्रतिनिधी
साईबाबा जन्मभूमी वादावरून शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारी सुट्टी असल्यामुळे भाविकांची साई दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी केली. मात्र, बाजारपेठा बंद असल्यामुळे साईभक्तांची मोठी गैरसोय झाली. शिर्डी शहरात ग्रामस्थ व साईभक्तांनी रॅली काढली. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून शिर्डीतील सर्व दुकाने, व्यवहार बंद होते.
सकाळी द्वारकामाईसमोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रॅलीची सुरवात ‘शिर्डी माझे पंढरपूर’ आरतीनंतर झाली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘ओम साई नमो नम:’ चा जयजयकार करीत पालखी मार्गाने परिक्रमा शहरात काढण्यात आली. यात साईचरित्रातील ओव्यांचे फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडय़ाच्या दौऱयावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर आता शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत. साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचे दावे केले जात असून, त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या बंदला सर्वपक्षियांचा पाEिठबा होता. मुख्यमंत्र्यांनी शिर्डी ग्रामस्थांसोबत मुंबईत बैठक ठेवली आहे. यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.
साईबाबा संस्थान बंदत सहभागी नाही
दरम्यान, शिर्डीतील साईबाबा मंदिर संस्थान या बंदमध्ये सहभागी झाले नसून, साईबाबांचे मंदिर नेहमीप्रमाणे खुले होते. संस्थांनकडून साईबाबांच्या जेवणाचा प्रसाद जो भक्तांना देण्यात येतो. त्याची वेळ रात्री 10 वाजेपर्यंतच असते, परंतु या बंदमध्ये भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानच्यावतीने ही प्रसादाची वेळ 12 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच शिर्डीतील अनेक युवकांनी लोकांना आमटी, भात आणि खिचडीचे देखील वाटप केले. रात्री राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शिर्डीला भेट दिली. याविषयी मुख्यमंत्री सोमवारी बैठक घेत असून, त्यानंतर तेच याबाबत माहिती देतील, असे भुजबळ यांनी नमूद केले.