प्रतिनिधी/ ..बेंगळूर
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची पुन्हा कोंडी झाली आहे. मागील आठवडय़ात मनी लाँड्रिग प्रकरणी शिवकुमार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले होते. आता दिल्लीतील न्यायालयाने त्यांना समन्स बजावले असून 1 जुलै रोजी सुनावणीसाठी हजर होण्याची सूचना केली आहे.
2018 मधील मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने विशेष वकील नितेश राणा यांच्यामार्फत शिवकुमारांसह पाच जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार न्यायाधीश विकास धुले यांनी शिवकुमार यांना मंगळवारच्या समन्स बजावले आहे.
शिवकुमार यांच्या मालकीच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये 8.5 कोटी रुपये आढळून आले होते. याप्रकरणी मंगळवारी ईडीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विकास धुले यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वकिलांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्टबरोबरच सेक्शन 120 बी अंतर्गतही सुनावणी करावी, अशी विनंती केली. त्यावर संमती दर्शवून न्यायालयाने डी. के. शिवकुमार, सचिन नारायण, सुनीलकुमार शर्मा, अंजनेय हनुमंतय्या आणि राजेंद्र यांना समन्स बजावून 1 जुलै रोजी न्यायालयात हजर होण्याची सूचना केली.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सप्टेंबर 2019 मध्रे शिवकुमार यांना ईडीने अटक केली होती. नंतर 23 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांना दिल्लीतील उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.