प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने यावषी दुर्गामाता दौडवर निर्बंध घातले. यामुळे युवापिढीची मोठी निराशा झाली होती. यासाठी शिवप्रति÷ानने विभागस्तरावर शिवचरित्र पारायण करण्याला सुरुवात केली. याला बेळगावच्या युवापिढीने उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. युवकांसोबत युवतीही यामध्ये सहभागी होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
छत्रेवाडा येथे पारायण करण्यात येत होते. त्याचसोबत खासबाग येथील दुर्गामाता मंदिर व ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरात पारायण करण्यात येत आहे. दौडच्यावेळेत धारकरी एकत्रित येऊन हे पारायण करीत आहेत. यामुळे शिवरायांचा पराक्रम युवापिढीला नव्याने समजू लागला आहे.
शिवचरित्र पारायणातून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास समजतोय
तुकाराम पिसे
आजपर्यंत चित्रपट, मालिका, नाटकांमधून शिवचरित्र मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु लेखकांनी आपापल्या मनाप्रमाणे हा इतिहास वळविला आहे. त्यामुळे शिवरायांचा जाज्वल्य इतिहास तरुणाईपुढे यावा, यासाठी भिडे गुरुजींनी शिवचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
शिवचरित्र पारायणामुळे शिवरायांचा इतिहास समजण्यास मदत
वैष्णवी धामणेकर
शिवचरित्र पारायणामुळे शिवरायांचा संपूर्ण इतिहास समजण्यास मदत होत आहे. नवीन अनेक संदर्भदेखील समजत आहेत. त्यांचे विचार युवापिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा एक चांगला उपक्रम असल्याचे तिने सांगितले.
प्रत्येक महिन्यात हिंदवी स्वराज्य सप्ताह करून पारायण करण्यात येणार
नामदेव पिसे
कोरोनामुळे दौडवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला दौडमध्ये सहभागी होता येणार नसल्याने शिवचरित्र पारायण सुरू करण्यात आले. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक विभागात तो राबविण्यात आला आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या 1 ते 7 या तारखांमध्ये हिंदवी स्वराज्य सप्ताह करून त्यामध्ये पारायण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.